काय सांगता! कोथिंबिरीने मिळवून दिले साडेबारा लाख; विक्रमी मोबदला मिळाल्याने चर्चेचा विषय

कोथिंबिरीच्या पिकाने शेतकऱ्याला चांगला मोबदला मिळाल्याची घटना नांदूरशिंगोटे येथे घडली. कोथिंबिरीचा बांधावर सौदा होऊन विनायक हेमाडे या शेतकऱ्याला साडेबारा लाख रुपये इतका विक्रमी मोबदला मिळाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
चार एकर कोथिंबिरीचे साडेबारा लाख
हेमाडे यांनी आपल्या शेतात ४५ किलो बियाणे वापरून कोथिंबीर लागवड केली होती. सुमारे ४० दिवस पाणी व खतांचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यानंतर पीक काढणीस आले होते. याच वेळी दापूर येथील भाजीपाला व्यावसायिक शिवाजी दराडे यांनी थेट बांधावर येऊन साडेबारा लाखांत सौदा पूर्ण झाला. या व्यवहारापोटी या रकमेचा धनादेशदेखील हेमाडे यांच्या हाती सोपविण्यात आला.
दराडे त्यांच्या नियोजनानुसार या कोथिंबिरीची काढणी करणार आहेत. लागवडीवेळी बाजारभाव काय असेल याचा विचार न करता हेमाडे यांनी कोथिंबीर बियाणे शेतात टाकले होते. मात्र, त्यांच्या परिश्रमास योग्य मोल मिळाले असल्याची चर्चा परिसरात ऐकायला मिळते आहे.
बांधावरील व्यवहारात शेतकऱ्यास चांगला मोबदला
संगमनेर तालुक्यातील नान्नज येथील सोमनाथ वारुंगसे या शेतकऱ्याला एक एकर कोथिंबिरीचा मोबदला अडीच लाख रुपये इतका मिळाला आहे. नांदूरशिंगोटे येथील खरेदीदार रवींद्र व गणेश शेळके यांनी बांधावर सौदा करत हा व्यवहार पूर्ण केला.