विमानाला कोणते ‘इंधन’ वापरले जाते तुम्हाला माहितीये का ? जाणून घ्या त्याबद्दल

विमानाला कोणते ‘इंधन’ वापरले जाते तुम्हाला माहितीये का ? जाणून घ्या त्याबद्दल

आकाशातून झेप घेत जाणाऱ्या विमानाचे आता फारसे कौतुक उरलेले नाही. ढगांशी लपाछपी खेळत, निळ्या गगनातून विहार करणारे हे हवाईजहाज ताशी ९५० कि.मी. या प्रचंड वेगाने प्रवास करते.

जमिनीपासून दहा हजार मीटर उंचीवरून तरंगत जाणारे विमान म्हणजे एक वैज्ञानिक चमत्कार होय. माणसे आणि मालाची जलद ने-आण करणारी विमाने जेट इंजिनामुळे चालतात. या जेट विमानाची रचना विशिष्ट नि क्लिष्ट प्रकारची असते. त्यामुळेच महाकाय विमान आकाशातून झेपावू शकते.

विमानासाठी वापरले जाणारे इंधन अतिशुद्ध स्वरूपातले केरोसिन तेलच असते. काही जण त्यास ‘पांढरे पेट्रोल’ असे संबोधतात. त्यास ‘एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) असे तांत्रिक नाव आहे. काही विशिष्ट प्रकारच्या विमानात पेट्रोलसदृश इंधने वापरली जात असली तरी मोठमोठाली जेट विमाने या केरोसिन इंधनावरच उडतात.

प्रारंभीच्या काळात, साध्या केरोसिन तेलाचा वापर विमाने उडविण्यासाठी केला गेला होता. हळूहळू प्रवाशांची संख्या वाढली. विमानाच्या इंजिनाची रचना बदलत गेली. नव्या इंजिनाला जास्तीत जास्त शक्ती देणाऱ्या नि सुरक्षित ठेवणाऱ्या इंधनाची गरज लागली.

ए.टी.एफ. या इंधनातील सेंद्रिय रासायनिक संयुगे ही १५० ते ३०० अंश सेल्सिअस तापमानाला उकळतात. त्याची वाहकता प्रमाणबद्ध असते व ओतनिबदू खूपच कमी तापमानाचा असतो. एखाद्या ठिकाणी उड्डाण घेणारे विमान हवेतून तरंगत दुसऱ्या ठिकाणी उतरते. ही दोन्ही ठिकाणे लांबवरची असतात. या दोन्ही ठिकाणातील हवामानात फरक असतो.

तसेच वाटेतील हवाईमार्गाचे वातावरण हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकते. हवामान थंड असो वा गरम, विमानातले इंधन इंजिनाला सतत शक्ती पुरवीत राहते. ते गरमीमुळे उडून जात नाही की थंडीमुळे गोठत नाही. विमानाचे इंधन जळताना त्याचा काळा धूर बाहेर पडत नाही.

कारण त्यातील एरोमॅटिक्स संयुगाच्या प्रमाणावर कटाक्षाने मर्यादा ठेवली जाते. विमान आकाशातून उडताना त्याचे हवेशी घर्षण होते व मोठय़ा प्रमाणात उष्णता निर्माण होते, तसेच विद्युतभार निर्माण होतात. ए.टी.एफ. या गुणी इंधनावर त्याचा काहीच विपरीत परिणाम होत नाही.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate