‘हर हर महादेव’बद्दल नेमका आक्षेप काय? आव्हाड म्हणाले, “बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायला गेले हे कुठे…” | ncp mla jitendra awhad says distorted history shown in har har mahadev movie scsg 91

‘हर हर महादेव’बद्दल नेमका आक्षेप काय? आव्हाड म्हणाले, “बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायला गेले हे कुठे…” | ncp mla jitendra awhad says distorted history shown in har har mahadev movie scsg 91

ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडला. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. या संपूर्ण घटनाक्रमानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नेमका आक्षेप काय आहे याबद्दल भाष्य केलं.

‘हर हर महादेव’ आणि अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका साकारत असलेल्या ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटांना आव्हाड यांनी विरोध केला. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषद घेत इतिहिसाची मोडतोड करुन दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांना विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे मोठे विधान केले होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीमहाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केला, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. या विरोधानंतर सोमवारी आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसहीत थेट चित्रपटगृहातील चित्रपटाचा शो बंद पाडला.

आपली भूमिका स्पष्ट करताना आव्हाड यांनी, “ज्या पद्धतीने हे दोन चित्रपट येत आहेत आणि ज्या पद्दतीने त्याचं चित्रिकरण करण्यात आलं आहे त्याला आमचा विरोध आहे,” असं आव्हाड म्हणाले. तसेच, “या चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं आहे ते सगळं इतिहासाचं विद्रुपीकरण आहे. मावळा कसा असला पाहिजे. जेधे शतावलीमध्ये जे लिहिलं आहे त्याच्याबरोबर विरोधात चित्रपटामध्ये आलं आहे. मावळा असा गोरापान, दिसायला चिकणा असा मावळा कधी होता?” असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.

“शिवाजीमहाराजांच्या मांडीवरती झोपून आहे अफजलखान आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय,” असं आव्हाड म्हणाले. त्याचप्रमाणे ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजीमहाराजांच्या लढाईचं दृश्य दाखवण्यात आलं असून त्यालाही आव्हाड यांनी विरोध केला आहे. “बाजीप्रभू छत्रपती शिवाजीमहाराजांशी लढायला गेले आहेत. हे कुठे दिसलं? बाजीप्रभूंनी शिवाजीमहाराजांशी लढाई केली. बाजीप्रभू सच्चा सेवक होता शिवाजीमहाराजांचा,” असं आव्हाड ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विवीयाना मॉलमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Aniket Ghate