ललित प्रभाकरने चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, “आता पहिल्यांदाच…” | lalit prabhakar shared a video to announce special surprise for audience

ललित प्रभाकरने चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, “आता पहिल्यांदाच…” | lalit prabhakar shared a video to announce special surprise for audience

सध्या ललित प्रभाकर त्याच्या ‘सनी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. गेले काही दिवस तो या चित्रपटाच्या टीमबरोबर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलं आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा’ हा चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर हेमंत आता एक फ्रेश चित्रपट घेऊन येत असल्याने प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच ललित आणि या चित्रपटाची टीम या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज घेऊन येत असल्याची ललितने नुकतीच घोषणा केली.

ललित प्रभाकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत प्रेक्षक या चित्रपटाबद्दल दाखवत असलेल्या उत्सुकतेबद्दल आणि चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले. इतकंच नव्हे तर या व्हिडीओच्या मार्फत त्यांनी एक नवीन घोषणा केली आहे.

आणखी वाचा : ‘माझ्या नवऱ्याची बायको’चं येणार बॉलिवूड व्हर्जन, ‘हे’ आघाडीचे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

ललितने व्हिडीओमध्ये म्हटलं, “‘सनी’ या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी एक खास भेट घेऊन येत आहोत. विशेष म्हणजे असं मराठीत पहिल्यांदाच होतंय आणि ते शक्य झालं आहे तुमच्या प्रेमामुळे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप आभार. ‘सनी’चित्रपट येत्या १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा तो सिनेसृष्टीतल्या आमच्या मित्र मंडळींबरोबर आम्ही आधी बघतो. पण आता तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही असा एक शो खास प्रेक्षकांसाठी आयोजित केला आहे. १४ नोव्हेंबरला आम्ही या चित्रपटाचा प्रेक्षकांना एक खास शो दाखवणार आहोत. तेव्हा १४ तारखेला पुण्याच्या पिव्हीआर आयकॉनमध्ये संध्याकाळी ७:३० वाजता नक्की भेटा आणि आजच आपली तिकीट बूक करा. या खास शोला चित्रपटाची संपूर्ण टीमही उपस्थित राहणार आहे.”

हेही वाचा : चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज, ‘सनी’ चित्रपटात साकारणार हटके भूमिका

या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकर करणार असून चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग असे अनेक दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. घरापासून दूर राहणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे. इरावती कर्णिकने या चित्रपटाचं लेखन केलं आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत. ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Aniket Ghate