लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक फोन आला अन्…; भरत जाधव यांनी घेतला होता मोठा निर्णय, ‘तो’ किस्सा आजही चर्चेत | actor lakshmikant berde birth anniversary special memory with bharat jadhav see details

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक फोन आला अन्…; भरत जाधव यांनी घेतला होता मोठा निर्णय, ‘तो’ किस्सा आजही चर्चेत | actor lakshmikant berde birth anniversary special memory with bharat jadhav see details

मराठी सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगमुळे त्यांनी मराठी चित्रपटांमध्येच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही यश मिळवलं. मराठी चित्रपटसृष्टीत विनोदाचा बादशहा म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांची जयंती आहे. २६ ऑक्टोबर १९५४ साली त्यांचा जन्म झाला. आपला लाडका ‘लक्ष्या’ प्रेक्षकांना आजही आठवतो. तर कित्येक कलाकार मंडळी त्यांच्या आठवणीने भावुक होतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जयंतीनिमित्त अभिनेते भरत जाधव यांनी खास पोस्ट शेअर केली होती.

काय म्हणाले होते भरत जाधव?
“लक्ष्या मामा..! खूप आठवणी आहेत. आम्हा नवोदितांना त्यांनी ज्याप्रकारे वेलकम केलं, आधार दिला. त्यांनी आपलं स्टारपण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना मामा म्हणून हाक मारू शकायचो. खूप काही शिकलो त्यांच्याकडून. त्यांच्याबद्दल सांगायची सगळयात मोठी आठवण म्हणजे ‘पछाडलेला’ चित्रपट. ‘सही रे सही’ जोरात सुरू होतं. अशातच जानेवारी २००३ला महेश कोठारे सरांनी ‘पछाडलेला’साठी विचारलं आणि त्यांना लगेच काम सुरू करायचं होत. मला त्या एका वर्षात ऑगस्ट २००३ पर्यंत ‘सही चे’ जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते. त्यामूळे मी त्यांना नकार कळवला.”

“काही महिने गेले आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्या मामांचा फोन आला की, तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे… महेशला पटकन जाऊन भेट मी तुझ्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय. तो चित्रपट सोडू नकोस.”

आणखी वाचा – “मेरे आंखों में मत झांको…” नम्रता संभेरावची ‘लॉली’ पाहून सासूबाईंची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“मग त्याच रात्री उशिरा महेश सरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि तिथून लक्ष्या मामांना कळवलं की मी ‘पछाडलेला’ करत आहे. सांगायचा मुद्दा हा की, इतका मोठा माणूस चित्रपटामध्ये कोणालाही घेऊ शकले असते. पण त्यांनी ती एवढी मोठी संधी मला दिली. ‘पछाडलेला’ला मी त्यांचा आशीर्वाद मानतो. विनम्र अभिवादन!” असं भरतने म्हटलं होतं. भरत यांच्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव खूप मोठं आहे.

Aniket Ghate