“या ६ बहिणींकडून…” भाऊबीजेच्या मुहूर्तावर केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित | kedar shinde launched new poster of his upcoming marathi film baipan bhari deva

“या ६ बहिणींकडून…” भाऊबीजेच्या मुहूर्तावर केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित | kedar shinde launched new poster of his upcoming marathi film baipan bhari deva

दिग्दर्शक केदार शिंदे हे कायम वेगळे प्रयोग करण्यावर जास्त भर देतात. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’सारखी मालिका असो किंवा ‘अगबाई अरेच्या’सारखा चित्रपट. केदार शिंदे हे कायम नावीन्यपूर्ण कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. सध्या ते त्यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. याबरोबर केदार हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात आणि त्यांची मतं ते बेधडकपणे मांडत असतात.

या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. शाहीरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी दिसणार असून, त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे झळकणार आहे. अजय-अतुल यांच्या खांद्यावर याच्या संगीताची जबाबदारी आहे. या चित्रपटाची वेगवेगळी पोस्टर्स नुकतीच प्रदर्शित झाली असून सगळेच यासाठी उत्सुक आहेत. याबरोबरच केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचीसुद्धा घोषणा झाली आहे.

आणखी वाचा : ‘राम सेतु’ पाहून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा झाले अचंबित; म्हणाले, “सगळे गैरसमज…”

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं आणि त्यानंतर यातील वेगवेगळ्या भूमिकांची ओळख करून देण्यात आली होती. या चित्रपटात ६ बहीणींची कथा उलगडणार आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. केदार शिंदे यांनी हे पोस्टर शेअर करत या ६ बहीणींकडून सगळ्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केदार पोस्टमध्ये लिहितात की, “फराळात किंवा फटाक्यांमध्ये जसे वेगवेगळे जिन्नस असतात तशाच एका घरातल्या या ६ बहिणी. आणि हा आहे त्यांच्या आयुष्याचा आरसा! ज्यात आपल्या प्रत्येकाला डोकावायला आवडेलच, पण सोबत स्वत:चं प्रतिबिंबसुध्दा दिसेल! या सहा बहिणींकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!”

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, दिपा चौधरी, शिल्पा नवलकर या सहा अभिनेत्री या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसतील. आई, आजी, बायको, मुलगी, बहिण, सासू, मावशी, काकी, आत्या अशा वेगवेगळ्या भूमिकांत या अभिनेत्री आपल्याला दिसणार आहेत. चित्रपटाचं हे नवीन पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ६ जानेवारी या दिवशी प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच केदार शिंदे त्यांच्या ‘जत्रा २’ या चित्रपटावरही काम करत आहेत.

Aniket Ghate