तब्बल १३ वर्षांनी अवधूत गुप्तेकडून ‘झेंडा २’ ची घोषणा, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर आधारित असणार चित्रपट | marathi director avadhoot gupte announced Zenda 2 Marathi Movie based on bjp leader girish mahajan political journey nrp 97

तब्बल १३ वर्षांनी अवधूत गुप्तेकडून ‘झेंडा २’ ची घोषणा, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर आधारित असणार चित्रपट | marathi director avadhoot gupte announced Zenda 2 Marathi Movie based on bjp leader girish mahajan political journey nrp 97

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ हा चित्रपट आजही लोकांच्या लक्षात आहे. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. हा चित्रपट शिवसेना आणि मनसे या दोन राजकीय पक्ष आणि ठाकरे कुटुंबियांमधील राजकीय संघर्ष यावर आधारित होता. अवधूत गुप्तेचा हा पहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट असल्याने तो त्याच्यासाठी खास होताच. पण त्याबरोबरच प्रेक्षकांनीही हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला. ‘झेंडा’ या चित्रपटानंतर ‘झेंडा २’ कधी येणार याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. अखेर त्याची घोषणा झाली आहे.

नुकतंच जामनेर येथे एक राजकीय कार्यक्रम पार पडला. जळगावातील जामनेर येथे भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे अवधूत गुप्तेच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नुकतंच हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करताना अवधूत गुप्तेने ‘झेंडा २’ या चित्रपटाबद्दलची घोषणा केली.
आणखी वाचा : “मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला

जामनेरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करताना अवधूत गुप्ते याने राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या राजकीय संषर्घावर आधारित मराठी चित्रपट करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. ‘झेंडा २’ हा चित्रपट गिरीश महाजन यांच्या जीवनप्रवासावर असेल असेही यावेळी अवधूत गुप्तेनं जाहीर केले.

“कार्यकर्ते जेवढे हतबल असतात, तितकाच नेता हतबल असतो हे दाखवणारा ‘झेंडा २’ चित्रपट असू शकतो. जळगाव जिल्ह्याला गिरीश महाजन यांच्यासारखं नेतृत्व लाभलं आहे. ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांना या प्रवासात घरापासून ते पक्षापर्यंत अनेक आव्हानांचा, विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर भविष्यात ‘झेंडा’ चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे” असे अवधूत गुप्ते म्हणाला.

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते…’ फेम मधुराणी प्रभुलकरची फसवणूक, शिवसेना नेत्याच्या हॉटेलमध्ये हजारोंचा गंडा

जामनेर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात अवधूत गुप्तने गिरीश महाजन यांची उघड मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत अवधूत गुप्तेच्या रोखठोक प्रश्नांना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट उत्तर देत राजकीय प्रवास उलगडला. हा प्रवास ऐकून अवधूत गुप्ते भारावून गेला. त्याने त्याच मंचावरून ‘झेंडा २’ हा चित्रपट गिरीश महाजन यांच्या आयुष्यावर आधारित करणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान ८ जानेवारी २००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘झेंडा’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला होता. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हे अवधूत गुप्तेने केलं होतं. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Aniket Ghate